My Royal Friend Ajij
अजिज हसन मुकरी : एक रॉयल माणूस
आधी आताची गोष्ट सांगतो . मी नोकरीनिमित्ताने अडीच वर्षे बाहेरगावी होतो . त्या दिवसात अजिज हसन मुकरी हा माझा एकमेव मित्र होता जो मला दर चार पाच दिवसांनी फोन करीत होता . मुख्य गोष्ट आता सांगतो . अजिज हा जैतापुरचा माणूस आहे. लहानपणी कदाचित खलील काझी , शब्बीर काझी ह्यांच्याबरोबर जैतापूरच्या मातीत, मांडवी परिसरात आम्ही खेळलो असू . आता स्मरत नाही. त्याला आता सुमारे चाळीस वर्षे झाली . कदाचित हायस्कूलच्या जीवनात तो मला भेटला असावा . एक नक्की , रत्नागिरीच्या राम आळीत सुमारे वीस वर्षापूर्वी रॉयल मेडिकल स्टोअर्समध्ये अजिजची आणि माझी भेट झाली तेव्हा कळले की तो जैतापूरचा आहे. मग काय विचारता ! पूर्वी न स्मरणारी दोस्ती पुढे सुरु झाली . सर्व संदर्भ सांगणे इथे योग्य नाही . एकच सांगतो की त्या काळात त्याने केलेली मदत, दिलेला धीर मी कधीही विसरू शकत नाही ! त्याशिवाय आम्ही एकाच विषयाचे विद्यार्थी असल्याचे पुढे १९८५-८६ मध्ये कळले आणि मग एक साहित्य प्रवास सुरु झाला. दैनिक रत्नभूमी, रत्नागिरी टाईम्स या स्थानिक वर्तमानपत्रात कविता, मराठी गझलसदृश्य कविता लिहू लागलो होतो. प्रदीप मालगुंडकर या माझ्या मित्राने माझी एक कविता रत्नभूमी प्रेसला हट्टाने दिली आणि ती प्रसिद्धही झाली. त्यापूर्वी माझ्या काही कविता पुण्याच्या स्मिता मराठी मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. प्रदीपच्या आणि अजिजला औषधांसाठी दुकानात येणारा आपला मित्र कविताही लिहितो हे कळल्यावर अजीजच्याही आग्रहामुळे, मी स्थानिक दैनिकात कविता, लेख प्रसिद्धीसाठी पाठवू लागलो. ते प्रसिद्धही होऊ लागले. गम्मत म्हणजे अजिजही लेखन करीत होता. विशेष म्हणजे आमचा मराठी गझलचा प्रवास एकाच वेळी सुरु झाला होता. मधुसूदन नानिवडेकरानी आदरणीय सुरेश भट यांना माझे नाव कळवले आणि भटांचे मला पत्रही आले . याचा अजिज साक्षीदार होता. आम्ही दोघे दीड वर्षे गझलसदृश लिहित होतो. भटांनी गझलची बाराखडी पाठवली आणि पुढे लोकसत्ताकडे पाठविलेल्या माझ्या गझला वाचून सर्वोत्तम केतकर यांनी मला पत्र पाठविले आणि मार्गदर्शन केले. पुढे गुरुवर्य भटांचेही मार्गदर्शन लाभले. गझलप्रमाणेच अन्य साहित्य हा अजिज आणि माझाही चर्चेचा विषय होता व तो दुवा आजही टिकून आहे तो केवळ अजिजच्या न थकता सातत्याने फोन करून मला साहित्यिक खुराक पुरविण्याच्या छंदामुळेच ! जीवनात कोणतेही साहित्यिक वातावरण नसताना चक्क मातृभाषा नसलेल्या मराठीत साहित्य निर्मिती करणारा आणि साहित्यावर गेली तीस पस्तीस वर्षे सतत बोलणारा अजिज हसन मुकरी हा माझा खराखुरा मित्रच नव्हे तर जैतापुरचा तो एक रॉयल माणूस आहे.
Comments